पोस्ट-ग्रॅज्युएशन झाल्यावर सुरुवातीला दुर्गम भागामध्ये काम करायचं, तिथला अनुभव घ्यायचा, थोडा कमी पगार मिळाला तरी चालेल, असं मनाशी ठरवलं. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथे प्लेसमेंटच्या वेळी मी मुद्दाम अशीच संस्था
निवडली जी आदिवासी भागामध्ये काम करते. भारतातल्या प्रतिष्ठित एम्स, दिल्ली येथून स्पेशलायझेशन करून आलेल्या चार तज्ज्ञ
डॉक्टरांनी मिळून बिलासपूर (छत्तीसगढ) शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या
गनीयरीं गावामध्ये ‘जन
स्वास्थ्य सहयोग’ नावाची संस्था
सुरु केली होती. १०० बेडेड आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयासोबतच इथे
सामुदायिक आरोग्य [कम्युनीटी हेल्थ] विभागा अंतर्गत ७२ गावांमध्ये आरोग्याची कामे
केली जातात. मी याच सामुदायिक आरोग्य विभागात "प्रकल्प समन्वयक" म्हणून
एप्रिल-२०१५ साली रुजू झालो. तीन वर्षाखालील
बालकांचा पोषण कार्यक्रम, प्रसूतीपश्चात माता आणि शिशु स्वास्थ कार्यक्रम, हात स्वच्छता कार्यक्रम हे तीन मुख्य कार्यक्रम मी तिथे
बघितले. सोबत सर्व आरोग्य कार्यकर्त्यांची ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग
करण्याचे कार्यसुद्धा माझ्याकडे होते. येथील दोन वर्षाच्या अनुभवाने मला बरेच काही
शिकवले. यामुळे माझा आदिवासी भागात काम करण्याचा उत्साह आणखी वाढला. पुढे मी मे २०१७
मध्ये महाराष्ट्रातील अतिदुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये
कार्यरत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पात काम करायला सुरुवात केली. इथली परिस्थिती
तर आणखीनच कठीण होती. आरोग्य समस्यांसोबतच भाषेचाही प्रश्न होता. शाळेतील
मुलं-मुली आणि काही निवडक शिक्षित गावकरी सोडले तर कुणालाही मराठी येत नव्हती. इथे
मी आणि सोनू (प्रकल्प समन्वयक) आम्ही दोघे २६ गावांमध्ये सामुदायिक आरोग्याचे
(कम्युनीटी हेल्थ) काम बघायचो. इथे २६ गावांमध्ये ६ आरोग्य केंद्रे
स्थापन केली होती आणि आरोग्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सुविधा
प्रदान करण्यात येत होत्या. काही महिने गेल्यावर एकमताने असं ठरलं की आपण माता आणि
शिशु स्वास्थ्य [Maternal and Child Health] यावर काम करायचं.
पण या २६ गावांमध्ये प्रसूती किती आणि कुठे (घरी की रुग्णालयात) झाल्या, त्या कुणी केल्यात आणि संबंधित अनेक बाबी याची प्रामाणिक
माहिती कुठेच नोंदवली नव्हती. शासकीय माहिती ही बरीच अंडर रिपोर्टेड आणि काही अंशी
दबावामुळे खोटी सुद्धा नोंदवली जाते असे आमच्या निदर्शनास आले. खरा डेटा माहिती
असणे खूप महत्वाचे म्हणून सुरुवातीला आम्ही या २६ गावांमध्ये सर्व्हे केला. यात
आम्हाला आमच्या आरोग्य कार्यकर्त्यांनी उत्तम मदत केली. सर्व्हेतून जो
निष्कर्ष निघाला तो थोडा धक्कादायकच होता. ५०-५५ टक्के घर-प्रसूती आणि तेही दाईंनी
केलेल्या,
५० टक्के नवजात बालकं ही कमी वजनाची, त्यात वेळेवर अॅम्ब्युलन्स
न पोहोचल्यामुळे घर-प्रसूतीचे प्रमाण अधिक होते. प्रसूता मातेचे वय कमी, रक्ताल्पता, शिक्षणाचा अभाव, प्रसूती पश्चात बाळाची आयोग्य काळजी इ. अनेक कारणे समोर
आली. (या निष्कर्षातूनच पुढे गरोदर माता
तपासणीसाठी चार ए.एन.सी क्लिनिक सुरु करण्यात आले.)
बऱ्याच गरोदर स्त्रियांना त्यांच्या शेवटच्या मासिक पाळीची तारीख (एल.एम.पी - Last Menstrual Period) विचारली असता ती
सांगता येत नव्हती. आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेवरूनच प्रसूतीची संभावित
तारीख [इ.डी.डी - Expected Date of Delivery] काढणे शक्य होते. त्यामुळे बाळंतपणाची
तयारी करणे सोपी जाते. जोखमीच्या मातेला तारखेपूर्वीच दवाखान्यात भरती करणे सोपे जाते. इ.डी.डी चुकीची असल्यास मोठा धोका होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. मग एल.एम.पी कशी काढायची हा मोठा प्रश्नच होता आणि
त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे हे काढायला आमच्या आरोग्य कार्यकर्त्यांना कसं
शिकवायचं ?
अनेक फील्ड-व्हिझिटस् आणि माडिया
स्त्रियांसोबत चर्चा केल्यानंतर एक गोष्ट आमच्या निदर्शनास आली की साक्षरतेअभावी
त्यांना तारीख जरी लक्षात येत नसली तरी त्यांना पौर्णिमा, अमावस्या, स्थानिक आदिवासी सण (पंडुम), ऋतू, बाजाराचा दिवस, शिकारीचा दिवस, कोंबडा बाजार, धान पेरणी-रोवणी-कापणी इ. अनेक बाबी सहज लक्षात राहतात. आम्हाला एक युक्ती
सुचली. आमच्या ६ आरोग्य कार्यकर्त्यांना आम्ही
डेली-डायरी दिली होती त्यात आम्ही त्यांना रोजची केलेली कामे लिहायला सांगत होतो.
त्याच डायरीमध्ये त्यांना त्यांच्या आणि आसपासच्या गावात होणाऱ्या मुख्य घटना, सण इ. नियमितपणे नोंदवण्यास सांगितले. प्रत्येक महिन्याच्या
शेवटी आरोग्य कार्यकर्त्यांच्या मासिक बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी
नोंदवलेल्या गोष्टी आमच्या मास्टर कॅलेंडर मध्ये लिहिणं सुरु ठेवलं.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ इ. प्रमाणेच माडिया लोकांचे पण महिने आहेत. त्यांना
चैत नेल्ला, डोंगा
नेल्ला,
कुमुड नेल्ला, माहि नेल्ला इ. अशी नावे आहेत. माडिया महिने समजण्यासाठी
आम्हाला "दी माडिया-गोंड्स ऑफ बस्तर" या पुस्तकाची बरीच मदत झाली. नंतर
आम्ही काही जुन्या माडिया लोकांकडून पण या महिन्यांची फेर-पडताळणी केली. माडिया भाषेमध्ये महिन्यांना ‘नेल्ला’ असे म्हणतात. मराठी महिन्यांप्रमाणेच
प्रत्येक नेल्ला हा सुद्धा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरु होतो आणि पुढे
येणाऱ्या अमावस्येला संपतो. याप्रमाणे पूर्ण बारा महिन्यांची यादी तयार झाली. अमावस्या-पौर्णिमेच्या
तारखा माहिती झाल्यावर प्रत्येक माडिया महिन्यांना इंग्रजी महिन्यांनुसार बसवायला
सोपी गेलं.
क्र
|
माडिया महिन्यांची
नावे
|
मराठी महिन्यांची नावे
|
इंग्रजी महिने
|
1.
|
चैत नेल्ला
|
चैत्र
|
मार्च – एप्रिल
|
2.
|
डोंगा नेल्ला
/ मूर
|
वैशाख
|
एप्रिल – मे
|
3.
|
कुमुड नेल्ला
/ ना
|
जेष्ठ
|
मे – जुन
|
4.
|
चुकला नेल्ला
/ हाइ
|
आषाढ
|
जुन – जुलै
|
5.
|
पोरा नेल्ला
/ हाघ
|
श्रावण
|
जुलै – ऑगस्ट
|
6.
|
नोवा नेल्ला
/ इरंज
|
भाद्रपद
|
ऑगस्ट – सप्टेंबर
|
7.
|
दसरा
नेल्ला / इरम
|
अश्विन
|
सप्टेंबर - ऑक्टोबर
|
8.
|
दिवाळी नेल्ला
/ ओर्मा
|
कार्तिक
|
ऑक्टोबर - नोव्हेंबर
|
9.
|
पाण्डी नेल्ला
/ पा
|
मार्गशीर्ष
|
नोव्हेंबर - डिसेंबर
|
10.
|
पुसि नेल्ला
|
पौष
|
डिसेंबर - जानेवारी
|
11.
|
माहि नेल्ला
|
माघ
|
जानेवारी - फेब्रुवारी
|
12.
|
दोगाडी
नेल्ला
|
फाल्गुन
|
फेब्रुवारी – मार्च
|
*माडिया
महिन्यांची नावे माहिती स्रोत: दी माडिया-गोंड्स ऑफ बस्तर, डब्लू.व्ही.ग्रिगसन,
|
|||
दुसऱ्या आठवणीत राहणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे इथले आठवडी बाजार आणि कोंबडा बाजार. हे बाजार कोणत्या दिवशी भरतात त्या दिवसांची नोंद केली.
क्र
|
वार
|
भाजी बाजार - गावाचे नाव
|
कोंबडा बाजार - गावाचे नाव
|
1.
|
सोमवार
|
पेरीमेली
|
-
|
2.
|
मंगळवार
|
-
|
धोडराज
|
3.
|
बुधवार
|
भामरागड
|
-
|
4.
|
गुरुवार
|
मन्नेराजाराम
|
-
|
5.
|
शुक्रवार
|
ताडगाव
|
आरेवाडा, कोठी
|
6.
|
शनिवार
|
-
|
नेलगुंडा
|
7.
|
रविवार
|
-
|
लाहेरी, कुमारगुडा,
चिचोडा, दुडेपल्ली
|
२६ गावांमध्ये होणारे पंडुम (स्थानिक सण) जसे विज्जा पंडुम, नोवा पंडुम, जाटा पंडुम, पिंडी पंडुम, इरकु पंडुम इ. यांच्या तारखा आम्हाला आमच्या आरोग्य
कार्यकर्त्यांकडून मिळायला लागल्या. याशिवाय सर्व ऋतू, काही निवडक हिंदू सण, शिकारीचे दिवस, धान रोवणी - पेरणी - कापणी- चुरणाचे दिवस, जंगलातून
लाकूड जमा करण्याचे दिवस, बांबू - तेंदूपत्ता कटाई, ताडी - गोरगा उतरविण्याचे दिवस, स्थानिक जत्रा, महिन्यानुसार लागणाऱ्या फळ-भाज्या, लग्नाचे महिने या सारख्या अनेक महत्वाच्या गोष्टींची काळजीपूर्वक नोंद
केली. अनेकदा फेर-पडताळणी करून सरतेशेवटी संपूर्ण बारा महिन्यांच्या तक्ता तयार
झाला. डिझायनरची (दीपक सुतार) मदत घेऊन त्याला छानसं आकर्षित स्वरूप द्यायला लावलं. याचा वापर
कसा करायचा हे आरोग्य कार्यकर्त्यांना शिकवलं.
उदा. एखाद्या गर्भवती स्त्री ने आपली शेवटची पाळी ही कुमुड नेल्ला मध्ये
पौर्णिमेच्या ३ दिवस नंतर आली होती असे म्हटल्यास आपल्याला कुमुड नेल्ला कोणत्या
तारखेत येतो आणि त्यात पौर्णिमेची तारीख सुद्धा माहिती आहे. त्या तारखेमध्ये तीन
दिवस मिळवले की एल.एम.पी काढता येते.
![]() |
| लोकल इव्हेंट कॅलेंडर 1 |
![]() |
| लोकल इव्हेंट कॅलेंडर 2 [डीझायनर : दीपक सुतार] |
आरोग्य कार्यकर्त्यांना अशिक्षित स्त्रियांकडून एल.एम.पी कशी काढायची याची
जेव्हा गरज भासली तेव्हाच "गरज ही शोधाची जननी आहे" या उक्तीनुसार
"स्थानिक कार्यक्रम दिनदर्शिका" म्हणजेच "लोकल इव्हेंट
कॅलेंडर" चा शोध लागला. आणि सर्वांच्या सहभागातूनच ते शक्य झालं. आजच्या आधुनिक डॉक्टरलासुद्धा अशा आदिवासी
भागामध्ये एल.एम.पी काढायला त्रास होईल पण आमचे आरोग्य कार्यकर्ते “स्थानिक कार्यक्रम दिनदर्शिका” च्या मदतीने ते सहज
काढू शकतात. आता ही दिनदर्शिका प्रत्येक गर्भवती स्त्री तपासणी दरम्यान वापरणे
सुरु आहे.
शब्दांकन:
डॉ लोकेश तमगीरे
डॉ सोनु मेहेर

